धाराशिव (प्रतिनिधी) -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध योजनांचे ऑनलाईन भरलेले अर्ज विद्यार्थी आणि महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.हे अर्ज निकाली काढण्यासाठी अंतिम संधी देण्‍यात येत आहे.प्रलंबित असलेले अर्ज विहीत मुदतीत निकाली न काढल्यास असे अर्ज महाडीबीटी प्रणालीतून कायमस्वरुपी रद्द (Auto Reject)  होणार आहे.विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसह इतर सर्व योजनांचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण फी परीक्षा फी योजना,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या विविध योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो.

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणात विद्यार्थीस्तर, महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याने सदर प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता वेळोवेळी सूचित केलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत विद्यार्थी तथा महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज निकाली काढलेले नाहीत.ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे .

त्या अनुषंगाने सन 2023-24 करिता महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी तथा महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विभागामार्फत अंतिम संधी दिली जात आहे.त्यानुसार विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्‍यासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत तर महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्‍यासाठी 25 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

विद्यार्थी आणि महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले अर्ज विहीत मुदतीत निकाली न काढल्यास असे अर्ज महाडीबीटी प्रणालीतून कायमस्वरुपी रद्द (Auto Reject) होतील.त्यामुळे विद्यार्थी लॉगिन तथा महाविद्यालय लॉगिनवर अर्ज प्रलंबित राहिल्याने एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी तथा महाविद्यालयाच्या प्राचार्याची राहील,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

 
Top