कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्यातील बळीराजा मोठया पावसाच्या प्रतिक्षेत आहे. रिमझीम पावसाने पीके उठावदार असली तरी नदी नाल्याची ओसंडुन वाहण्याची तहान भागली नाही. त्यातच पाटोदा जिल्हा बीड येथे झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा नदीला अचानक महापुर आला. बीड- धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबादच्या अरुंद पुलावरून पाणी आल्याने गावचा संपर्क तुटला आहे. यामुळे गावकऱ्यांना नेहमीप्रमाणेच याचा मोठा फटका बसला असून शेती शिवारात पण घुसल्याने पीके पाण्यात गेली आहेत.
धाराशिव-बीड-लातुर जिल्ह्याची तहान भावगणारा मांजरा प्रकल्प अल्यल्प पावसामुळे भरलेला नाही. मांजरा प्रकल्पाच्या पाण्याचे उगमक्षेत्र हे पाटोदा असल्याने वरच्या क्षेत्रात पाणी पडले तरच हा प्रकल्प भरतो. पाटोदा परिसरात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने या परिसरातील जमीनी पाण्याने खरडुन जावुन शेती शिवारात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. त्यातच या महापुराचा फटका फक्राबाद ता. वाशी या गावाला बसला.
धाराशिव, बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबाद गाव हे मांजरा नदी पात्राजवळच आसल्याने या गावाला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. मांजरा नदीला पुर आला की पावसाळयात या गावचा संपर्कच तुटतो. धाराशिव आणी बीड जिल्ह्याच्या सिमेवर हे गाव असल्याने प्रशासन व राज्यकर्त्यासाठी हे गाव कदाचीत दुर्लक्षीत असल्याने पावसाळ्यात पुराचा सामना करतेय.