उमरगा (प्रतिनिधी)- ग्राहकांना सर्वाधिक फसवले जाणारे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. वजनाची हेराफेरी करून खुलेआम ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहक सर्रास लुटले जात असताना बाजारातील विक्रेत्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे ग्राहकांचे उघड्यावर खिसे कापले जात असल्याचे चित्र सध्या परिसरातील आठवडी बाजारात दिसून येत आहे.

उमरगा हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी कमालीची गर्दी असते. यातील बहुतांश ग्राहक हे बिगारी कामगार, मजूर, शेतमजूर आहेत. वजन मापाची पुर्ण माहिती नसल्यामुळे याचाच फायदा व्यावसायिक घेत असतात. वजनात हेराफेरी, काटा मारणे, प्रमाणीत वजनाचा उपयोग न करणे हे प्रकार सर्रास विक्रेत्यांकडून होताना दिसतात. त्यांच्या कडून होत असलेल्या या धोक्यात मात्र जनतेच्या आपल्या घरखर्च नियोजनाचा पुरता बोजवारा होत असतो. विक्रेत्यांच्या या हेराफेरी मध्ये किलोभराची भाजी अर्धा तीन पाव ग्राहकांना मिळत असल्याच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्राहकाच्या होणाऱ्या अशा फसवणूकीची दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे ग्राहकांची मुस्कटदाबी होत आहे. सर्वात मोठी खंत अशी की, या धोकेबाज विक्रेत्यांना त्यांचे सहविक्रेते देखील अशा प्रसंगी सहयोग करतात. त्यामुळे ग्राहकांचा नाविलाज होतो. आठवडी बाजारात हजारो ग्राहक भाजी व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. त्यामुळे या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. आठवडी बाजारात ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपाययोजना या ठिकाणी केली जात नाही. म्हणून बाजारातील विक्रेत्यांच्या मनमानीला सजग ग्राहकही बळी पडत आहेत. ग्राहकांच्या या असुरक्षिततेला आणि फसवणुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.

 
Top