धाराशिव (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने राज्यभर नाट्य जागराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनापासून पुढील चार दिवस धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या नाट्य जागरमध्ये लावणी महोत्सव, वेगवेगळी नाटके, सुगम संगीत व लोककलावंतांचा परिसंवाद व मेळावा होणार आहे. या नाट्य जागर कार्यक्रमांत जिल्ह्यातील कलावंतांनी सहभाग नोंदवावा व नाट्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
शहरातील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेस अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी नियामक मंडळ सदस्य विशाल शिंगाडे, सल्लागार राजेंद्र अत्रे उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे यांनी सांगितले की, 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. शहरात नाट्य चळवळ वाढीस लागावी यासाठी नाट्य परिषद शाखा प्रयत्नशील आहे. मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरांत होणारे नाटकांचे सादरीकरण धाराशिवमध्ये होत आहे. धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित नाट्य जागरचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, नाट्य परिषदेचे कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नाट्य परिषदेचे (उपक्रम) उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सहकार्यवाह दिलीप कोरके, मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमी विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, प्रसिध्द नाट्य सिनेकलावंत प्रा. डॉ. सुधीर निकम आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
असे असतील कार्यक्रम
15 ऑगस्ट रोजी नांदी व उद्घाटन समारंभ, शाहिरी पोवाडा, बतावणी, कलावंतांचा मेळावा, बालनृत्य स्पर्धा, वाघ्या मुरळी लोककला, 16 ऑगस्ट रोजी जागर लोककलेचा, झाडीपट्टी परिसंवाद, एकांकिका व बालनाट्य स्पर्धा, तमाशा लोकनाट्य तमाशा मंडळ कराड, 17 ऑगस्ट रोजी स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, नाट्य परिसंवाद - डॉ. सुधीर निकम, सुगम संगीत - सुजित माने, पारंपारिक लावणी महोत्सव, 18 ऑगस्ट रोजी स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, लोककलावंतांचा परिसंवाद - डॉ. गणेश चंदनशिवे, नाट्य कलेचा जागर, राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा सन्मान सोहळा, झाडीपट्टी नाटक, असे कार्यक्रम होणार आहेत.