धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह़याला टीबीमुक्त बनविण्यासाठी प्रशासन अग्रेसर असून टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांची मोठया प्रमाणात अंमलबजावणी झाल्याने 71 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत.या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींचा टीबी मुक्त ग्रामपंचायत 12 ऑगस्ट रोजी गौरव करण्यात आला असून लातूर परिमंडळामध्ये धाराशिव जिल्हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकामध्ये अग्रेसर आहे.हा गौरव सोहळा जिल्हा परिचारिका प्रशिक्षण विभागाच्या सभागृहात पार पडला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरदास,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ धर्माधिकारी,जिल्हा लसीकरण अधिकारी कुलदीप मिटकरी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफीक अन्सारी,डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ.सम्यक खैरे,परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य माधव सरवदे, डॉ.चंद्रकांत एवाळे वैद्यकीय अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी,सर्व एनटी ईपी स्टाफ,सर्व सरपंच, वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरदास यांच्या हस्ते धन्वंतरी,महात्मा गांधीच्या प्रतीमेस,रॉबर्ट कॉकच्या प्रतीमेस हार घालून दीप प्रज्वलन करून शुभारंभ केला.
प्रास्ताविकातून बोलताना जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी म्हणाले,संशयीत क्षयरुग्न शोधण्याचे प्रमाण प्रती लाख 3400 चे उद्दिष्ट असून जुलै अखेर 2830 साध्य केले आहे.लातूर सर्कलमध्ये चारही जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्हा या इंडिकेटरमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तसेच 2024 मध्ये जास्तीत जास्त टिबीमुक्त पंचायत करून जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरदास यांनी आपल्या मार्गदर्शनातून टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंच यांचे आभार व्यक्त केले.तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंचांना निक्षय मित्र म्हणून उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
सन 2023-24 मध्ये टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमात सहभागी होवून टीबी मुक्त झालेल्या धाराशिव तालुक्यातील 8,तुळजापुर 5,परंडा ८, वाशी 8,भूम 12,कळम 13,उमरगा 8, लोहारा 9 अशा एकूण 71 ग्राम पंचायतींचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ग्रामपंचायत टिबी मुक्त होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी, एसटीएस,एस टी एल एस, टीबीएचव्ही,एएन एम, एम पी डब्ल्यू, आशा कार्यकर्ते व गावातील लोकप्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा पीपीएम कॉर्डिनेटर संध्या व्दासे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.