धाराशिव (प्रतिनिधी)- चुलत्याचा खून केल्या प्रकरणी पुतण्याला धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची व 35 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी नळदुर्ग येथील आरोपी खंडू लक्ष्मण कोळी याला शिक्षा सुनावली. जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ही शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा खून असल्याचे पोलिस तपासात समोर आले. खंडू याने अकस्मात मृत्यूची तक्रार दिली. मात्र फिर्यादी पुतण्याच आरोपी निघाला. सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. गोरे यांनी या खुनाचा उलघडा करीत तपास केला होता. या प्रकरणात 15 साक्षीदार यांची साक्ष तपासणी करण्यात आली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक आर. एस. म्हेत्रे यांनी काम पाहिले.
25 फेब्रुवारी 22 रोजी नळदुर्ग येथील संजय कौळी हे दररोजच्या प्रमाणे टपरी बंद करून घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नात्याने पुतण्या असलेल्या आरोपी खंडू कोळी याला त्याचा मित्र किरण मस्के याचा फोन आला की संजय कोळी हे पाटील मळ्याजवळील कॅनलमध्ये पडून मयत झाले आहेत व तिथे पडले आहेत. त्यानंतर खंडू कोळी याने संजय कोळी यांच्या मरणाबाबत कोणावर संशय व तक्रार नसल्याची तक्रार देत अकस्मात मृत्यूची पोलिसात नोंद केली. मतयाच्या मुलाला कोळी यांच्या डावा डोळा, कानाच्या मध्यभागी तसेच डोक्याला मारहाण झाल्याचे व रक्तस्त्राव झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम 302 व 201 नुसार गुन्हा नोंद केला. आरोपी खंडू व मयत संजय कोळी हे एकाच रिक्षातून एका बिअर बारमध्ये आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. यात बार मालक, वेटर व इतर असे 15 साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. एका महिलेला मयत संजय कोळी यांनी त्यांचे घरी आणून ठेवल्याने खंडू याचा वाद झाला व त्यातून त्याने चुलता संजय यांचा डोक्यात दगड घालून खून केला. कोर्टात समोर आलेला पुरावा व शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून 26 वर्षीय आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.