धाराशिव (प्रतिनिधी)- घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. 2 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत सुभाष सिद्राम चौगुले यांनी एका व्यक्तीचा घरकुलाचा प्रस्ताव तुळजापूर पंचायत समितीकडे पाठविण्याकरिता तीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने 2 ऑगस्ट रोजी तुळजापूर पंचायत समिती परिसरात सापळा लावला. लाच मागणी पडताळणी दरम्यान ग्रामसेवकाने पंचासमक्ष यापूर्वी दोन हजारांची लाच स्विकारल्याचे मान्य केले. आणखी तीन हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ग्रामसेवक सुभाष चौगुले यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलिस अंमलदार आशिष पाटील, सिध्देश्वर तावसकर यांच्या पथकाने केली.