ढोकी (प्रतिनिधी)- अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने धाराशिव जिल्हास्तरीय अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. बालकांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत. त्यांना वाचनाची गोडी लागावी. यासाठी ही स्पर्धा निमित्त ठरली आहे.
या स्पर्धेचा पहिला टप्पा 9 ऑगस्ट ते 3 जानेवारी व दुसरा टप्पा 1 एप्रिल ते 15 जून असा आहे. एकूण चार फेऱ्यात ही स्पर्धा होऊन त्यातून अक्षर आनंद महा- उत्कृष्ट बालवाचक निवडला जाईल. बालकांच्या सर्वांगीण वाचनाला व लेखन भाषणातून अभिव्यक्तीला प्रधान्य दिले आहे. खालील मुद्द्यात पुस्तके वाचून बालवाचकांनी नोंदी कराव्यात. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, मुखपृष्ठ, मलपृष्ठ यावर माहिती लिहावी. पुस्तकात काय आवडले? का आवडले? त्यातून काय बोध मिळाला, पुस्तक वाचून मित्रांना काय संदेश देणार, पुस्तकातून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग तुला कुठे करता येईल, पुस्तकाला नवीन नाव सुचव, तुझ्या कल्पकतेने पुस्तकातून संदेश देणारे चित्र काढ. अशा नोंदी करून नोंदवह्या समन्वयकाकडे जमा करायच्या आहेत. त्यातून तालुकास्तर व जिल्हास्तरावर उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन सन्मान केला जाईल. तरी धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालवाचकांनी व शाळांनी या वाचन कृती कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे,जिल्हा समन्वयक प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, निशिकांत पाटील, मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे,समाधान भातलवंडे,रमेश सावंत,अण्णासाहेब धावारे,विजय बिक्कड,यांनी केले आहे.
असे होणार गुणांकन
बारा मुद्द्यानुसार पुस्तके वाचून नोंदवहीत नोंदी केल्यास दोन गुण अन्यथा प्रति पुस्तक एक गुण., मासिक, पाठ्यपुस्तक वाचन (5 गुण), वर्तमानपत्र वाचन (5 गुण ), मी वाचलेले पुस्तक यावर व्हिडिओ,ऑडिओ क्लिप तयार करणे(5 गुण),अक्षर आनंद ई-बाल मासिकासाठी स्वलिखित लेखन पाठवणे(5 गुण),
हस्ताक्षर (5 गुण), नोंदवही चे अंतरंग व बाह्यरंग सजावट नक्षीकाम चित्रे (5 गुण).
चार फेऱ्या
पहिली फेरी शाळा स्तर : नोंदवहीत नोंदी केलेल्या पुस्तकांची संख्या व गुणदान निकषानुसार निवड. दुसरी फेरी तालुका स्तर : नोंदवही गुण, मुलाखत, गटचर्चा. तृतीय फेरी : एक एप्रिल ते 15 जून दरम्यान परत सखोल पुस्तक वाचन. चौथी फेरी जिल्हास्तर : मुलाखत,गटचर्चा, स्वलेखन पहिल्या फेरीतील नोंदवही व तिसऱ्या फेरीतील नोंदवही यांचा एकत्रित विचार करून अक्षर आनंद महा- उत्कृष्ट बालवाचक निवडले जातील.