धाराशिव (प्रतिनिधी)- केशेगांव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ या आर्थीक वर्षाची २७ वी अधिमंडळाची वार्षीक बैठक कारखान्याचे अध्यक्ष श्री. अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि.२८/०८/२०२४ रोजी कारखाना साईट, अरविंनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली.
कारखाना कामकाजास सुरुवात करणेपुर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत श्री. गोरे यांनी केले. तद्नंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी सभेच्या विषय सुचीचे वाचन केले. सभेच्या कामकाजास सुरुवात करणेपुर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री एस.पी.डाके यांनी अहवाल सालात दिवगंत झालेल्या व्यक्तींना श्रध्दाजंली वाहुन वार्षीक बैठकीच्या कामकाजास सुरुवात केली. त्यानंतर मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.
यावेळी अरविंद गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, आपल्या कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे. टनावरून ५००० मे. टन होण्यास आपले सर्वांचे सहकार्यातूनच शक्य झाले. तसेच प्रदुषित पाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी डिस्टीलरीसाठी व शेतीसाठी सीपीयू प्रकल्प उभा केला. तसेच बी-हेवी पासून इथेनॉल निर्मीतीसाठी १८ लाख लि. क्षमतेचा स्टोअरेज टँक उभारला. परंतू सरकारच्या निरनिराळ्या धोरणामुळे कारखान्यास मोठा तोटा सहन करावा लागला. इथेनॉल निर्मीतीवर बंदी आणल्याने केलेली गुंतवणूकीचा बोजा वाढून कर्ज वाढले व त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागला. तसेच दोन वर्षापूर्वी साखर निर्यातीस परवानगी दिल्यामुळे साखरेला चांगले दर मिळून परिस्थिती सुधारणेस फायदा झाला. परंतू परत धोरणात बदल करून साखर निर्यातीस बंदी घातल्याने मोठे नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस शेती चांगली केली तर कारखान्यास चांगल्या प्रतीचा ऊस पाठवला तर साखर उतारा चांगला मिळून ऊसाला भाव चांगला देता येईल. या अनुषंगाने कमी खर्चात व कमी पाण्यात जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन कसे घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी लवकर परिपक्व होणाऱ्या कोसी ६७१ व एमएस १०००१ या ऊस जातीच्या लागवडीला प्राधान्य दिले पाहिजे. या अनुषंगाने कारखान्याने १५ नोव्हेंबर २०२४ पुर्वी या दोन ऊस जातीच्या रोपाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास हेक्टरी ५००० रु. कारखाना रोप अनुदान देणार असल्याचे सांगीतले. आजपर्यंत कारखान्याने सभासद व बिगर सभासद यांचा नोंदलेला १०० टक्के ऊस गाळप केला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक अॅड. निलेश पाटील यांनी सभा संपलेचे जाहीर करुन उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.