धाराशिव (प्रतिनिधी)-  मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेने शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. धाराशिव येथे मंगळवारी (दि.27) सकल शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध करत मोदी सरकार व राज्यातील युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवप्रेमींनी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. कोसळल्यानंतर पुतळा उभारणी किती निकृष्ट दर्जाची होती हे समोर आले आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांनी उभारलेले किल्ले अजून मजबूत आहेत. तसेच महाराष्ट्रात चाळीस-पन्नास वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या पुतळ्यांना अद्याप कसलाही धक्का लागलेला नसताना आठ महिन्यात पुतळा कोसळतोच कसा? असा सवाल शिवप्रेमींनी यावेळी केला. दरम्यान धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालून अभिवादन करण्यात आले.

पाचशे कोटी रुपये खर्चून उभारलेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळणे ही सरकारसाठी शरमेची बाब आहे. त्यामुळे शिवरायांचा पुतळा पुन्हा नव्याने चांगल्या दर्जाचा उभारण्यात यावा. तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या मे.आर्टिस्टी कंपनी, संबंधित कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, नौदल विभाग व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलीस ठाणे व आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाच्या प्रती देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी धाराशिव शहरातील सकल शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top