धाराशिव (प्रतिनिधी) - नागरिकांच्या खात्यावर रक्कम असेल तर तो खर्च करतो.यामुळे बाजारपेठेत आर्थिक देवाण-घेवाण होवून अर्थकारण सुरु राहते. याचा थेट परिणाम राज्याच्या आणि देशाच्या सकल देशातंर्गत उत्पादनात (जीडीपी) वाढीसाठी होतो.त्यासोबतच महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होवून कुंटूंबाचे दरडोई उत्पन्न वाढण्यासदेखील हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.
" मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ.घोष बोलत होते.यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बालकल्याण) देवदत्त गिरी, प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अनिल कांबळे, तेरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जिवन राठोड, तुळजापूर बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.घोष म्हणाले की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला आणि मुलींना स्वावलंबी,आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी,यासाठी तयार करण्यात आली आहे.तसेच ही सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.योजना राबविण्यासाठी कमी कालावधी होता.त्यातही जिल्हयातील महिला बाल विकास विभागाचे अधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका,मदतनीस यांनी मोठी मेहनत घेवून या योजनेचे अर्ज भरून घेवून लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविली आहे.
जिल्ह़यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक करताना प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री.कांबळे म्हणाले,.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 14 ऑगस्टपासून दोन महिन्याचा लाभ त्यांच्या बँक आधार संलग्न खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह़यातील 3 लाख 24 हजार 659 महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याचा इष्ठांक निश्चित करण्यात आला आहे.16 ऑगस्टपर्यंत नारीशक्ती ॲपवर 1 लाख 79 हजार 911 अर्ज भरले गेले.मात्र, तांत्रिक आडचणीमुळे ॲपवर दबाव तयार झाल्याने तक्रारी वाढल्या होत्या.यावर जिल्हाधिकारी यांनी लाडक्या बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्याच्या सुचना केल्या.ऑफलाईन अर्ज भरुन घेवून त्यातील 1 लाख 34 हजार 268 अर्ज वेब पोर्टलवर तीन दिवसात अपलोड केले. 1 लाख 79 हजार 911 अर्जांपैकी जवळपास 1 लाख 74 हजार 341 अर्ज पात्र ठरले आहेत.पात्र महिलांच्या बँक खात्यावर स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला म्हणजेच 14 ऑगस्टपासून दोन महिन्याचा एकत्रित लाभ प्रत्येकी 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हयातील महिला लाभार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात धाराशिव तालुक्यातील तुगाव येथील रुपाली शेंडगे व शेकापूर येथील संगीता लोखंडे यांनी या योजनेचा लाभ बँक खात्यात जमा झाल्याने मनोगत व्यक्त केले.पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण सभागृहात उपस्थित असलेल्या महिलांनी बघितले.
कार्यक्रमाला माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती कुलकर्णी, जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती जमादार, परिविक्षा अधिकारी अरविंद थोरात, व्यंकट देवकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी. कोवे, विधी सल्लागार शशिकांत पाटील, जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन भुजंग भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यंकट देवकर यांनी मानले.
10 महिलांना प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात संगिता अंकुशराव, लक्ष्मी मगर, रुपाली कंदले, निर्मला कांबळे, रुपाली हिंदोळे, वर्षा जाधव, रोहिणी सुरवसे, अनिता वाघमारे व अनुराधा सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते दोन महिण्याचे लाभाचे प्रतिकात्मक धनादेश देण्यात आले.