धाराशिव (प्रतिनिधी)- शाहू पाटोळे यांनी लिहिलेल्या कडुसं पुस्तकात भुतकाळातील ज्ञान व वर्तमान काळातील भान या पुस्तकात आहे. जे भोगलय व जे पचवलयं ते या पुस्तकात आहे. त्यामुळेच पाटोळे यांनी समाजातील दांभिकता मोडून काढण्यासाठी लिखाणाद्वारे आसुड ओडले आहेत. असे प्रतिपादन इतिहास तज्ञ प्रा. ए. डी. जाधव यांनी केले आहे.
रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील प्राचिन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातनशास्त्रचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. माया पाटील, जनसंज्ञापन विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रविंद चिंचोलकर उपस्थित होते. मसप व मिरा प्रकाशन छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पुढे बोलताना पाटोळे यांनी या पुस्तकात समाजातील मुळ गाभा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रा. जाधव यांनी सांगितले. तर माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी कडुसं हे पुस्तक बोली भाषेत असून, जगण्यासाठी जो संघर्ष करतो त्या स्वभाव व गुणधर्मातून पुस्तकातील भाषा आहे. आण्णाभाऊ साठे यांची भाषा व शाहू पाटोळे यांची पुस्तकातील भाषा सारखीच आहे. तर प्रा. डॉ. माया पाटील यांनी लेखक शाहू पाटोळे यांनी मनन, चिंतन करत आत्मभान राखत स्पष्टवक्ते पणे लिखान केले आहे. तर प्रा. डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी जिथे आम्ही लिहिण्याचे थांबतो, तेथून शाहू पाटोळे यांचे लिखान चालू होते. समाजातील व्यंग शाहू यांनी आपल्या पुस्तकात दाखवून दिले आहे. बाबा आमटे यांची भारत जोडो यात्रा असो किंवा समाजातील दांभिकता असो हे सर्व कडुसं मध्ये पाटोळे यांनी मोठ्या धाडसाने मांडले आहे. त्यामुळेच कडुसं मधून विसंगतीवर बोट ठेवणारे लिखान झाले आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार दौलत निपाणीकर यांनी मानले. या कार्यक्रमास संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी महेश अय्यगर, मिरा प्रकाशनचे जीवन कुलकर्णी, डॉ. पंकज गांधी, ठाकूर आदीसह पाटोळे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतो.