धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयातून उच्च शिक्षण घेऊन अनेक संशोधन करणारे विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात पेट साठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षेचे केंद्र सुरू व्हावे अशी मागणी अभाविप संचलित विद्यापीठ विकास मंचाने प्रकलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, धाराशिव येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसरात वेगवेगळ्या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन पात्रता परीक्षा पेट देण्याचे केंद्र सुरू व्हावे. जेणेकरून धाराशिव सारख्या मागास जिल्ह्यात अनेक संशोधन संशोधक तयार होतील. विद्यार्थ्यांच्या संशोधन दृष्टीला वाव मिळावा आणि जिल्ह्यातील अनेकानेक संशोधक विद्यार्थी तयार व्हावेत. यासाठी विद्यापीठ उपकेंद्रात पेट परीक्षेचे केंद्र तात्काळ सुरू व्हावे. तसेच यासाठीची तोंडी परीक्षा व्हायव्हा उपकेंद्रात घेण्यासही विद्यापीठाने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सिनेट सदस्य देविदास पाठक, प्राध्यापक नाना गोडबोले आणि विद्यापीठ विकास मंचाचे आदित्य सुधीर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन देताना विद्यापीठ विकास मंचाचे प्राध्यापक सर्जेराव जिगे हे उपस्थित होते.