धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अधिपत्याखाली सोनीपत (हरीयाना) येथे घेण्यात आलेल्या आशियाई आर्चरी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा रिकर्व्ह धनुर्धर रैयान सिद्दिकी याची भारतीय संघात निवड झाली आहे. 

तैवान चीन येथे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आशियाई आर्चरी स्पर्धेत  त्याने स्थान निश्चित केले आहे. तो रिकर्व्ह प्रकारातून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आज तागायत राज्य राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके जिल्हा सह राज्यास पटकावून दिले आहेत. विशेष म्हणजे गत महिन्यात कोरिया येथे झालेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी केंद्र शासनाकडून रैयानला पाठवण्यात आले होते.

वडील तोफिक सिद्दिकी यांचे नेहमीच पाठबळ असणाऱ्या रैयानने धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कोच नितीन जामगे यांच्याकडे आर्चरीचे प्रशिक्षण घेण्यास  सुरवात केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय आर्चरी कोच रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली रिकर्व्ह प्रशिक्षण घेत आहे. 

प्रबळ इच्छाशक्ती आणि कामगिरी पाहता रैयान आगामी स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी घालत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवेल अशी आशा ठेवत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कार्याध्यक्ष अविनाश गडदे, उपाध्यक्ष अतुल अजमेरा , सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे,  सदस्य डॉ श्रीकांत कवठेकर, अनिल जमादार, सुधीर बंडगर,  स्पर्धा विभाग प्रमुख नितीन जामगे, तांत्रिक समिती अध्यक्ष प्रताप राठोड,  सचिव कैलास लांडगे आदींसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी रैयानचे अभिनंदन केले आहे.

 
Top