धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजच्या युवकांसाठी खूप काही करण्यासारखे आहे परंतु त्यासाठी जिद्द व अपार कष्ट करण्याची तयारी हवी ,ग्रामविकासाच्या संकल्पनेत बायोगॅस निर्मिती मधून स्त्रियांचा स्वयंपाक करण्याचा वेळ वाचला व त्या वेळेमध्ये स्त्रियांना इतर गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून शिकवण्यात आल्या  त्यामुळे स्त्रिया स्वावलंबी झाल्या आहेत  त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. अशी बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची यशोगाथा डॉ. प्रसाद देवधर यांनी विषद केली. असे सामाजिक कार्य करत असताना ते सुद्धा प्रोफेशनली केले पाहिजे. प्रत्येक कार्य करत असताना शास्त्रीय दृष्टिकोन व गणिताची सांगड घालून केल्यास यश प्राप्ती होते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजच्या युवकांसाठी खूप काही करण्यासारखे आहे परंतु त्यासाठी जिद्द व अपार कष्ट करण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनी आपला वेळ मोबाईल मध्ये वाया न घालता, त्या वेळेमध्ये नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "विद्यार्थ्यांचा ग्राम विकासामध्ये सहभाग" या विषयावर डॉ. प्रसाद देवधर, भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार देविदास पाठक, सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर हे अध्यक्ष म्हणून तर डॉ. जितेंद्र कुलकर्णी, विभाग प्रमुख जैवतंत्रज्ञान विभाग व डॉ. मकरंद चौधरी, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव जिल्हा  त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  सदरील कार्यक्रम विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डॉ. पी.पी. दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

     कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा मध्ये देविदास पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्य करावे, जे की ग्रामीण भागातील जनतेसाठी उपयोगी पडेल. डॉ. प्रसाद देवधर सारखे व्यक्ती हे समाजाला प्राप्त झालेले रत्न आहेत. त्यांचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्य करावे. असे प्रतिपादन देविदास पाठक यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मेघश्याम पाटील यांनी केले. प्रास्ताविकानंतर भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान च्या कार्यासंबंधी चित्रफीत दाखवण्यात आली. ज्या मधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. डॉ. प्रसाद देवधर यांनी आपल्या विविध प्रकल्पाविषयी माहिती दिली. 

 कार्यक्रमाचे आभार डॉ. जितेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा भातलवंडे यांनी केले.

 
Top