धाराशिव (प्रतिनिधी)- रूपामाता ॲग्रोटेक प्रा. लि. संचलित, रूपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. 1 पाडोळी (आ) या कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाच्या सन 2024-25 साठीच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रम रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड व सधन शेतकरी रामदास गुंड यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
धाराशिव-तुळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांची व सुशिक्षित युवकांची गरज लक्षात घेऊन सदरील कारखाना ग्रामीण भागात उभारण्याचा संकल्प केल्याचे यावेळी ॲड. गुंड यांनी सांगितले. यंदाच्या हंगामात तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी वाहतूक यंत्रणा, ऊस तोडणी यंत्रणा सज्ज असून, यंत्र सामग्रीच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. येणारा गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न होईल असा विश्वास ॲड.व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केला. कारखाना वेळेत चालू होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्व विभागाची कामे वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.