धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या नाट्यभूमीला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा आहे.महाराष्ट्रात नाट्य चळवळ ही मोठ्या शहरातच अधिक वाढत आहे. मागास भागात नाट्य चळवळ, नाट्यगृह, आणि नाट्य रसिक वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी केले.
ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक महोत्सवात बोलत होते. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवार, 18 ऑगस्ट रोजी समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रध्दांजली वाहून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे,नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, दादा साळुंके, सुमित फुलमागडे, माजी नियामक मंडळ सदस्य घाणेकर सर, किरण फडके, सुशांत कुलकर्णी,उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सहभागी धाराशिव नाट्य परिषद शाखेच्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना गडेकर म्हणाले की, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटक हे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधनाचे काम ही मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी केली. या कार्यक्रमाचे संचलन विशाल शिंगाडे यांनी तर आभार सतीश ओहळ यांनी मानले. यावेळी शहरातील नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झाडीपट्टीतील गद्दार हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक आनंद भिमटे, दिग्दर्शक नरेश गडेकर, निर्माता नितू बुध्दे पाटील, नेपथ्य प्रमोद ढोंगे,संगीत राकेश राऊत यांनी दिले आहे. या नाटकात आसावरी तिडके, सुनिल अष्टकर, अरविंद झाडे, रत्नदीप रंगारी, शुभम मसराम, चैतन्य दुबे, सोनाली निस्ताने,या कलाकारांनी अभिनय केला.