धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सर्व विभागात उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्याच्या धोरणात मराठवाड्यावर कायम अन्याय होता आला असून जोपर्यंत मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिक या प्रश्नावर जागरूक होत नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही. असे प्रतिपादन सेवानिवृत्त अभियंता आणि जलसमृद्धी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचे शंकरराव नागरे यांनी केले. ते धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील जलभूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलसंवाद कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे सिनेट सदस्य पत्रकार देविदास पाठक आणि अभियंता जिरे उपस्थित होते.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी न्यायालयापर्यंत हा लढा आपण नेला असून मराठवाड्यातील पाणी समस्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भातून अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याच्या हक्काचे मिळालेच पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. असे प्रतिपादन नागरे यांनी यावेळी केले.

या प्रश्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव आणि पत्रकार या समन्यायी पाणी वाटपासाठी जलसमृद्धी प्रतिष्ठान सोबत असल्याची ग्वाही देऊन पत्रकार देविदास पाठक यांनी यावेळी याविषयी जनजागृती करण्याची तसेच सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील जलभूमी व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन पाटील तसेच सर्व विद्यार्थी, शेतकरी, पत्रकार आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top