भूम (प्रतिनिधी)- सत्ताही कधी मागून मिळत नाही. ती हिसकावून घ्यावी लागते. सत्ता उपभोगणारे तेच, आरक्षण मागणारे तेच आहेत. ओबीसीचे आरक्षण 1994 रोजी मिळाले आणि हे म्हणतात 70 वर्षांपासून आरक्षणाचा लाभ घेत आहेत. असे प्रतिपादन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. भूम येथे सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी नगर पालिकेसमोरील प्रांगणात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे आगमन झाले त्यावेळी प्रा. हाके हे बोलत होते.
यावेळी प्रा. हाके यांनी सत्ताधारी व विरोधांवर सडकून टीका केली. त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत तसेच माजी आ राहुल मोटे यांच्यावर टीका केली. ते बोलताना पुढे म्हणाले कि, ओबीसी, एससी, एसटी समाज बांधवानी आपल्या एकीची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत आपल्या मतांचा उपयोग यांनी सत्ता उपभोगण्यासाठी केला आहे. येथून पुढे आपण आपल्याच उमेदवाराला निवडून आणले पाहिजे. आरक्षण वाचवायचे असेल तर मतदानाच्या माध्यमातून एकजूट दाखविणे गरजेचे आहे. आपले लोक विविध पक्षात असतात. त्यांना महत्व नसणारी पदे दिली जातात. निवडणूक, आर्थिक फायद्याची पदे म्हटले कि, पाटील, देशमुख पुढे येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मोठी ताकद दिली आहे. त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे.
मराठा समाज हा वतनदारी राखण्यासाठी निजामाकडे गेला होता. त्यामुळे कुणबी नोंदी सापडत आहेत. आरक्षण हे जन्माने जे मागास आहेत त्यांना दिले जाते. मराठा समाज कोठेच मागासपण सिद्ध करू शकलेला नाही. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर कारखाने, शिक्षण संस्था, बँक, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे यांनीच स्वतःकडे घेतली. यावेळी गजानन सोलंकर, कृष्णा सानप, सतीश बांगर, श्रीराम चौरे, वंचितचे प्रविण रणबागुल, नाना मदने, उमेश मोराळे, रामभाऊ इटकर, भैय्या जानकर, राजभाऊ देवकते, शहाजी सोलंकर, दादासाहेब मुंढे, उमाकांत सानप, विकास पाटील, पंडित मरकड, श्रीमंत शेळके, राहुल देवकते यांच्यासह ओबीसी बांधव मोठया संख्येने हजर होते.