धाराशिव  (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व्हर वर लोड वाढल्यामुळे ऑनलाईन प्रकियेचा वेग मंदावला असुन यामध्ये सुधारणा करण्याकरीता योग्य ती दुरुस्ती करण्याची प्रकिया सुरु आहे. योजनेच्या अंमलबजावणी मध्ये येत असलेल्या अडचणी निदर्शनास आणुन देत त्या दुर करण्याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क सुरु आहे. लवकरच ही प्रक्रीया सुरळीत होईल. अगदी शेवटचा फार्म ऑनलाईन होई पर्यत हि प्रक्रिया सुरु राहणार असुन सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटीबध्द असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

माता भगीनींची गैरसोय टाळण्यासाठी योजनेचा कालावधी वाढविण्यासह ऑफलाईन फार्म जमा करण्याची सुविधा शासनाकडुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑफलाईन स्वीकारलेले अर्ज अंगणवाडी सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर व ग्रामपंचायत मधील डेटा ऑपरेटर च्या माध्यमातुन ऑनलाईन करण्यात येणार असुन यासाठी शासनाच्या माध्यमातुन त्यांना प्रति अर्ज रु.50 दिले जाणार आहेत.

अंगणवाडी सेविकांना जेवढे अर्ज ऑनलाईन करणे शक्य आहे, तेवढे करुन उर्वरीत अर्ज इतरांकडून ऑनलाईन करुन घेतले जाणार आहेत. योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली असल्याने माता भगीनींनी काळजी करु नये, ऑगस्ट मध्ये ऑनलाईन केलेल्या लाभार्थ्यांना देखील जुलै पासुन या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.  

 
Top