धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिवला सुसज्ज व अद्यावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकाम करण्याकरिता मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे जलसंपदा आणि कौशल्य व उद्योजकता विकास विभागाची 12 हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रत्यापीत करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी मध्ये झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

विद्यार्थी व रुग्णांच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर असलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जलसंपदा विभागाच्या मालकीची राष्ट्रीय महामार्गालगतची जागा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया साठी उपलब्ध करून द्यावी यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा होता. छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही जागा देण्याचा निर्णय झाला व त्या अनुषंगाने शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यास प्रशासकीय पातळीवर विलंब होत असल्याने आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. 05/07/2024 रोजी बैठक घेतली.

सदरील बैठकीमध्ये जागा प्रत्यापणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निर्णयाप्रमाणे ठरलेली जागा प्रत्यापित करण्यासाठी ज्ञापन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्यात दोन्ही विभागांना पत्र देऊन पुढील कार्यवाही तातडीने करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. सदरील बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  दिनेश वाघमारे, उपसचिव अहिरे, अवर सचिव  जोगदंड, महसूल विभाग उपसचिव श्री. धारुरकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अधिष्ठाता डॉ. डोमकुंडवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top