कळंब (प्रतिनिधी)- वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे गेल्या दहा दिवसापासून तालुक्यातील खोंदला गाव चक्क अंधार कोठडीत आहेत. याकडे लोकप्रतिनिधीचे ना लक्ष ना अधिकाऱ्याचा ताळमेळ नागरिकांना मात्र पाण्यासाठी दिवस रात्र वन वन भटकत फिरावे लागत आहे. तर जनावराच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. कळंब तालुक्यातील खोंदला गावाचा ट्रान्सफॉर्म जळाल्याचे कारण सांगून या गावाचा वीज पुरवठा गेल्या दहा दिवसापासून खंडित केला गेला आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतात ना सरपंच, ना पुढारी कुणाचेच काही याकडे लक्ष नसल्यामुळे गावकऱ्यांची चांगली तारांबळ होत आहे.
वीज वितरण कंपनीचा कळंब शहराला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर गेल्या काही दिवसात जळाला असल्यामुळे शहराला इतर खेडेगावातून वीज पुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील खोंदला या गावाचाही ट्रांसफार्मर जळाल्याचे सांगून त्या गावचा वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे गावकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून अधिकाऱ्याला जॉब विचारला. अधिकारी मात्र काही दिवसात ट्रान्सफॉर्मर भरून येईल व तो तात्काळ जोडला जाईल असे आश्वासन देऊन गावकऱ्यांची बोळवण करून त्यांना परत पाठवले. या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक भागात तर वीज वितरण कंपनीने सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. अखंडित विज तर सोडाच पण शेतकऱ्यांना साधी आठ तास सुद्धा वीज वितरण कंपनी वीज पुरवठा करू शकत नाही हे यावरून चित्र स्पष्ट दिसत आहे. अनेक दिवसापासून वीज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले असून सर्वच कामे या विजेवर चालतात. पण वीज मात्र अखंडित ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र कुठेतरी कमी पडलेले दिसतात. या गावचा प्रश्नी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरत आहे .
येत्या दोन-तीन दिवसात या गावचा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होऊन येईल व त्यांचा वीज पुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता एम. जी. सय्यद यांनी दिली आहे.