धाराशिव (प्रतिनिधी)- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आज जिल्हा वार्षीक योजनेची बैठक पार पडली. य बैठकीदरम्यान पिक कर्जासाठीची सिबीलची अट काढून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याचे टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सुचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली यावेळी आमदार कैलास पाटील व जिल्हाधिकारी, डॉ. सचिन ओम्बासे उपस्थीत होते.
महाविकास आघाडीचे सरकार अस्थित्वात असताना जिल्हा वार्षीक विकास योजनेतून मोठया प्रमाणात शहरातील रस्ते दुरुस्तीकरीता मोठया प्रमाणावर निधी मंजुर करण्यात आला होता. परंतू महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सदर निधीस स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जिल्हा नियोजन समिती मार्फत मोठया प्रमाणात निधी मंजुर केला असून सदरील कामे लवकर व दर्जेदार करणेबाबत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून सुचना देण्यात आली.
जलजिवन मिशन अंतर्गत जिल्हयात चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रथमत: पाणीपुरवठा विहीरीचे काम हाती घ्यावे. तसेच सदरच्या विहीरीला पाण्याची शाश्वती असल्यास पुढील काम हाती घ्यावे असे सुचविले. जिल्हा नियोजन समितीतून शेतीकरीता नविन ट्रान्सफार्मर बसविण्याकरीता मोठया प्रमाणात निधी वाटप केला असून या निधीतून वॉरंटी संपलेल्या ट्रान्सफार्मर मोठया प्रमाणात खरेदी केल्याची गंभीर बाब समोर आली. वॉरंटी संपलेल्या ट्रान्सफार्मर बसविल्यास ते वारंवार जळण्याचा धोका असून त्यामुळे शेतीस सुरळीत विज पुरवठा होवू शकणार नाही.
तसेच जिल्हयातील बँकानी पिक कर्जा करीता असलेली सिबीलची अट काढावी तसेच पिक कर्ज टाळणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत बँकांनी त्यांच्या शाखेत स्केल ऑफ फायनन्स बँकाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ तसेच कर्ज वाटप किती झाले आहे याची माहिती शाखेच्या दर्शनी भागात लावावी अशा सुचना देण्यात आल्या. या बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे सह सर्व निमंत्रीत उपस्थीत होते.