धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यंत्रणांनी विविध विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करून निधी खर्च करावा तसेच विविध योजना योजनेच्या लाभार्थ्यांना देखील वेळेतच योजनांचा लाभ द्यावा. असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीचे सभा आज 18 जुलै रोजी नियोजन समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. डॉ.सावंत बोलत होते.सभेला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,राणा जगजीतसिंह पाटील,कैलास पाटील घाडगे,ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,समितीचे विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र धुरगुडे, नवनाथ जगताप व महेंश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, नगरपालिका यंत्रणांचे काही वर्षाची कामे आजही अपूर्ण आहे. ही गंभीर बाब आहे. अपूर्ण कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामे गुणवत्तापूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहे.कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असली पाहिजे. ज्या एजन्सीने कामे वेळेत पूर्ण केली नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी.केलेल्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. गाव तेथे स्मशानभूमी हा उपक्रम देशात राबवणारा धाराशिव हा पहिला जिल्हा आहे. स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या जागेसाठी निधी दिला आहे,अधिकार देखील दिले आहे. तरीसुद्धा ही कामे वेळेत होत नाही ही गंभीर बाब असल्याचे डॉ सावंत म्हणाले.

तीन महिन्याच्या आत स्मशानभूमीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन प्रा. डॉ. सावंत म्हणाले,जर तीन महिन्यात ही कामे पूर्ण होत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात याची नोंद घेण्यात यावी. महावितरणाने आवश्यक त्या ठिकाणी रोहित्र लावण्याची कामे वेळेच्या आत पूर्ण करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.आवश्यक तेवढी रोहित्र जिल्ह्यात उपलब्ध असावी.वीज पुरवठ्यात तुटवडा नसावा. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना विमा अनुदानाची मिळालेली रक्कम बँकांनी त्यांची खाते गोठून ठेवली आहे.शेतकऱ्यांचे पीक कर्ज बँकांनी अडवू नये.सिबिलमुळे पीक कर्ज देताना बँकांनी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करू नये. बँकांनी ज्या शेतकऱ्यांची खाते गोठविली आहे ती काढण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे, त्या बँकांच्या शाखामधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी व ठेवी काढून घेण्यात याव्यात असे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले,ज्या बँका शेतकऱ्यांना सिबिलवरून पीक कर्ज देण्यास नकार देत असतील तर त्या बँकेविरुद्ध एफ आय आर दाखल करावा असे ते म्हणाले. 

खासदार राजेनिंबाळकर यांनी धाराशिव नगरपरिषदेअंतर्गत सन 2020 ते सन 2023 या कालावधीतील कामे अपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण नसल्याची बाब यावेळी पालकमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.धाराशिव शहरातील नागरिकांना या अपूर्ण कामामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.ही कामे गुणवत्तापूर्ण व चांगली करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे तसेच आवश्यक तेवढे रोहित्र जिल्ह्यात उपलब्ध असावे. शेतकऱ्यांना वीज समस्या उद्भवणार नाही याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. 

आमदार काळे यांनी शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.सिबिलच्या कारणावरून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाऊ नये असे ते म्हणाले. यावेळी आमदार कैलास पाटील व आमदार चौगुले यांनीसुद्धा विविध विषयांवर चर्चा करून समस्यांची सोडवणूक तातडीने करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

सभेत जिल्हा वार्षिक योजना सन 2023 -24 यावर्षीच्या 31 मार्च 2024 अखेरच्या खर्चास मान्यता देण्यात आली.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 340 कोटी,जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) 74 कोटी आणि जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजना) 1 कोटी 98 लक्ष अशी एकूण अर्थसंकल्पित तरतूद 415 कोटी 98 लक्ष रुपये होती.त्यापैकी 415 कोटी 98 लक्ष रुपये 31 मार्च 2024 अखेर खर्च झाला.या खर्चात समितीने मान्यता दिली.

सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक योजनेचा 30 जून 2024 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 408 कोटी रुपये अर्थसंकल्पित तरतूद आहे त्यापैकी 30 जूनपर्यंत 3 कोटी 7 लक्ष खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत) 75 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपाययोजना क्षेत्रबाह्य योजना) अंतर्गत 13 कोटी रुपये अशी एकूण 496 कोटी रुपये अर्थसंकल्पीत तरतूद असून 30 जून 2024 अखेर एकूण 6 कोटी 74 लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी यावेळी दिली.सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.काही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांच्याकडून खर्च करण्यात आलेल्या व खर्च करण्यात येणाऱ्या निधीची माहिती दिली. 

यावेळी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या 14 लाख 25 हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाने ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल सभागृहाने पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.हा देशातील अशाप्रकारचा एकमेक उपक्रम असल्याचे  पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.

 
Top