धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.याकडे खासदार,आमदार असो की माजी नगराध्यक्ष कोणीही लक्ष देत नाही,आता आपणच याकडे घाला अशी विनंती शहरातील तरुणांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे केली होती.त्याला प्रतिसाद देत आ.पाटील यांनी दिनांक 17 जुलै रोजी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने कालबद्ध कार्यक्रम आखून रस्ते दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याबाबत आदेश दिले होते.
पाहणी करताना आ.पाटील यांच्यासमोर महिला व युवकांनी खराब रस्त्यांमुळे त्यांना होणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला.भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे थोडासा पाऊस झाला तरी सर्व रस्ते चिखलाने माखले जातत. वाहने तर दूरच पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे अवघड होते. अशा परिस्थितीत पालिकेने योग्य पद्धतीने रस्त्यांची देखभाल केली नाही. मुरूमाऐवजी मोठे दगड रस्त्यावर टाकण्यात आले. यामुळे अनेकजण रस्त्यावरून घसरून पडून जखमी झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या व्यथा ऐकून आ.पाटील यांनी मुख्याधिकारी फड यांना धारेवर धरले व यासाठी जबाबदार अभियंत्याला नोटीस द्या,भुयारी गटार योजनेचे काम झाले त्याठिकाणी तातडीने ट्रेंचवर्क करा,मुरूम टाकण्यासाठी टेंडर एकाऐवजी 6 जणांना द्या व तातडीने रस्ते दुरुस्ती चालू करा असे आदेश दिले असता आज पालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.
आ.पाटील यांच्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती केली आहे तसेच यासाठी जबाबदार अभियंता श्री.दुकर वैजीनाथ यांना नोटीस काढली आहे,तसेच भुयारी गटार योजनेच्या कंत्रादारांना . 1 नगर परिषद गेट ते महात्मा फुले चौक. 2. महात्मा फुले चौक ते टीव्ही सेंटर 3. एसपी ऑफिस ते माणिक चौक 4. पुष्पक मंगल कार्यालयासमोरील रस्ता 5. विसर्जन विहीर ते सुधीर पाटील यांचे घर 6. रामकृष्ण पेट्रोलपंप स्वामी समर्थ मंदिर रस्ता या ठिकाणचे ट्रेंच चे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली म्हणून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उबाठा गटाचे वरातीमागून घोडे- नितीन काळे
धाराशिव शहराचे खासदार,आमदार व नगराध्यक्ष पद गेली 5 वर्षांपासून उबाठा गटाकडे आहे.त्यांच्या भ्रष्ट व अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील नागरिकांना आज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.आज शहरातील रस्ते व नाल्याची जी दुर्दशा झाली आहे त्या ला सर्वस्वी जबाबदार हेच लोक आहेत.काल आमदार राणा पाटील यांनी पाहणी केली व काम सुरू झाले की लगेच यांनी आंदोलनाचं नाटक सुरू केले आहे.यापूर्वी देखील त्यांनी उजनी योजनेचे पाणी शहराच्या जवळ आले की आंदोलन केले होते,पिकविम्याचे पैसे जमा व्हायला सुरू झाले की उपोषण केले होते आता देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे तो देखिल त्याच धर्तीवर केवळ स्टंटबाजी आहे.