भूम (प्रतिनिधी) शिवप्रेमी व गडदुर्ग प्रेमी भूम तालुका यांच्या वतीने शिवभक्त व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावे व विशालगड व इतर गडावरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. या मागणीसाठी भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशाळगडावर अतिक्रमणाचा मुद्दा बऱ्याच दिवसांनी गाजत असताना देखील शासनाने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे .म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी नाईलाजास्तव दिनांक 14 जुलै रोजी हजारो शिवभक्ता बरोबर विशाळगडावर जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती संभाजी महाराज व शिवभक्त जाण्या अगोदर त्या ठिकाणी काही प्रकार व घटना घडल्या होत्या. त्याच अनुषंगाने शिवभक्तावर चुकीचे व खोटे गुन्हे नोंद केले आहेत. त्याचा तीव्र निषेध भूम तालुका शिवप्रेमी व गडदुर्ग प्रेमी यांनी केला आहे. व इतर गडावरील अतिक्रमणे जमीन दोस्त करावेत व छत्रपती संभाजी राजे व शिवभक्तावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.