कळंब (प्रतिनिधी)- अनादी काळापासून समाज मनावर संस्काररुपी विचारांची पेरणी केल्यामुळे थोर युग पुरुष निर्माण झाले. मात्र काळाच्या ओघात बिघडत चाललेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आता सद्गुरूच्यां विचारांची गरज आहे . त्याशिवाय सामान्य माणसाला जीवनात मुक्ती मिळणार नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनी डिकसळ येथे रविवारी गुरुपोर्णिमेंनिमित्त आयोजित भव्य-दिव्य पारंपारिक गुरुमंत्र व गोपाळकाल्याच्या कीर्तनसेवेच्या प्रसंगी केले.
डिकसळ येथे दरवर्षी पारंपारिक गोपाळ काल्याचे आयोजन केले जाते. सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिरासमोर पारंपरिक भारुडाचा कार्यक्रम पार पडला. तर दुपारी दोन ते चार यावेळेत गुरुवर्य ह भ प प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याच्या कीर्तन झाले.
यावेळी बोधले महाराज बोलताना म्हणाले की, विशुद्ध अंतःकरणाला ज्ञानप्रकाशाच्या सहाय्यानं ऊर्जेचा साक्षात्कार होणं म्हणजे संतपण होय. संतांची वाणी परतत्त्वस्पर्शित असते. त्यांच्या घरी “शब्द' धन असते. ते सर्वांसाठी असून, सर्वांना पुरणारं व पूर्ण करणारं आहे. संतांचं जीवन संघर्षमय असतं. सर्वसामान्य स्तरात जन्म घेऊन ते महान झालेले असतात. त्यांची बौद्धिक उंची, संवेदनशीलता, करुणामय व्यक्तिमत्त्व, जगाला बदलण्याची असीम ताकद, क्रियाशीलता, नैतिकता, प्रसंगी वज्राप्रमाणं कठीण होऊन स्वतःच्या सिद्धांतावर जगाला आरूढ करतात. सामान्य माणसानं एखाद्याला संत म्हटल्यामुळं तो संत होतोच असं नव्हे. ज्ञानामुळं झालेले ज्ञानी व अनुभवी यात फरक आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले .
कीर्तनानंतर उपस्थितांना काला वाटप करण्याचा मान असलेले मानकरी विशाल महाराज बोधले यांना खास पद्धतीने गोपाळ गड्यानी खांद्यावर घेतले त्यानंतर डोक्यावर काल्याची हंडी घेऊन भाविकांना गोपाळ काल्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. परमेश्वर महाराज बोधले, हभप बाळासाहेब महाराज बोधले हभप. अण्णा महाराज बोधले, रामेश्वर महाराज बोधले, विजय बोधले, नवनाथ महाराज अंबिरकर, अशोक काटे, नामदेव काळे, किरण कदम, वैजिनाथ जाधव ,रामदास काळे, संजय काटे, डिगांबर खंदारे, सौदागर काळे, समाधान जाधव, भागवत कदम, अनंत अंबिरकर, नामदेव काटे, विलास महाराज बोधले, मुकुंद बोधले, जयदीप बोधले, कुलदीप बोधले, सचिन बोधले आदि तरुण मंडळी व ग्रामस्थांनी विशेष परीश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेला उपस्थित होते.
शेकडो भाविकांनी घेतला गुरुमंत्र
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी येथील श्रीगुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेत हभप. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांच्या कडून गुरुमंत्र घेतला. सकाळी आठ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.