धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्यावर परत एकदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण मुद्दा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी धाराशिव येथील हतलाई तलावात 9 युवक व 4 महिलांनी जल आंदोलन चालू आहे. त्यापैकी एकाच्या तोंडात, नाकात पाणी गेल्याने तातडीने सदर युवकास शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यानंतर धाराशिव-बार्शी या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विनंती केल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. जल आंदोलन मात्र रात्री 7 पर्यंत चालूच होते.
सोमवार दि. 22 जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी 8 ते 10 युवकांनी हतलाई तलावात उतरून आंदोलन चालु केले होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार पोलिस पथक, अग्निशामक दलाची गाडी हे तलावापाशी आले. यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन परत घेण्याची विनंती केली. आंदोलन करीत असतानाच एका आंदोलनकर्त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेले. त्यानंतर अभिजीत सुर्यवंशी, बलराज रणदिवे, काकासाहेब लोमटे, अक्षय नाईकवाडी, प्रजय पवार, निखील जगताप, पांडूरंग तुपे, प्रकाश पाटील, राहुल घुटे, सोनु भोसले, ॲड. भाग्यश्री रणखांब, शिला उंबरे, सौ. इंगळे 9 पुरूष व 4 महिला हतलाई येथील पाण्यात उतरून रात्री 7 पर्यंत त्यांचे जल आंदोलन चालू होते. यापैकी राहुल घुटे यांच्या नाका, तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले. आंदोलनकर्त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले.