उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घेतली आहे. प्रतिदिन दोन तास वृक्षलागवड व वृक्षसंवर्धना करिता वेळ निश्चित केला आहे. मागील दोन महिन्यात स्वखर्चातून शहरातील विविध ठिकाणी वड, पिंपळ, कडूनिंब, कांचन, करंज, जांभूळ, आंबा, सिताकळ, नारळ, चिकू आदी प्रजातीच्या पाच हजार झाडांची लागवड करून या झाडांचे संवर्धन केले जात आहे. निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ग्रीन उमरगा उपक्रमाला वृक्षप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमाप जंगलतोड, निसर्गावर मानवाचे अतिक्रमण होऊन एका बाजूला अमाप वृक्षतोडी मुळे निसर्गाचे संतुलन बिघडून पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. वृक्षतोडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या वृक्षतोडी मुळे मोठया शहरा मध्ये प्राणवायूचा तुटवडा भासू लागला आहे. पावसाच्या प्रमाणातही कमालीची घट होत आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई मुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. सर्वत्र सिमेंट इमारतीची बांधकामे दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. निसर्गातील पशुपक्ष्यांना जगणे कठीण झाले आहे. सर्वच सजिवांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. प्रदुषणाच्या प्रमाणात कमालीची वाढ होत आहे. निसर्ग सौंदर्य अबाधित रहावे. पक्षांना व प्राण्यांना जगण्याचा मुक्त आनंद घेता यावा यासाठी उमरगा येथील निसर्गप्रेमी मंडळीनी पुढाकार घेतला आहे. शहरातील खुल्या जागेवर स्वखर्चातून झाडे आम्ही लावणार झाडे आम्ही जगविणार ही संकल्पना घेऊन निसर्गप्रेमी ग्रुपने “ग्रीन उमरगा“ करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यासाठी या मंडळातील सदस्यानी आपल्या दैनंदिन जीवनातील दोन तासाचा वेळ वृक्षलागवड व वृक्षसंवर्धना करिता निश्चित केला आहे. बसस्थानक , साईधाम , साईनगर ,रस्ता दुभाजक , शहरातील विविध ठिकाणातील खुल्या जागा या ठिकाणी गेल्या दोन महिन्याच्या कालावधी दरम्यान स्वखर्चातून पाच हजार झाडांची लागवड करून या झाडांचे संवर्धन केले जात आहे. वड, पिंपळ, कडूनिंब, कांचन, करंज, जांभूळ, आंबा, सिताकळ , नारळ, चिकू या विविध झाडांचा समावेश आहे. सचिन माशाळकर , डॉ. लक्ष्मण सातपुते, ॲड. वैभव जाधव, महेश कवठे, राहूल पोतदार, रवि अंकलकोटे, संदीप पांचाळ, राहूल शिंदे, आनंद मोरे सह निसर्गप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेऊन ग्रीन उमरगा करण्याचा निर्धार केला आहे.