उमरगा (प्रतिनिधी)-  शेतकरी, शेतमजूर कोणत्याही एका जातीचे नाहीत त्यांचे प्रश्न सोडवले तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल. आमदार आणि प्राध्यापकांना अडीच लाख पगार कशासाठी लागतो. असा सवाल करुन प्रहारचे 25 आमदार निवडून आले तर आमदार आणि प्राध्यापकांचे पगारी कमी करुन एक लाख रुपये करणार. लाडकी बहिण नको आणि लाडका भाऊ नको आता जो सर्वसामान्यांसाठी काम करेल असा लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री हवा आहे. योजनेसाठी पैसे नसतील तर राजभवन विका आणि ते पैसे कष्टकऱ्याना द्या. असे परखड मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले.

उमरगा येथे श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी, श्री 108 डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी, श्री 108 अभिनव सूतरेश्वर महास्वामी, महंतय्या स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते आमदार कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळा (दि.29) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की,  मी कधीही जातीची धर्मावर बोललो नाही आजपर्यंत मी जनतेच्या हक्काची लढाई लढलो आहे. फाटका, कष्ट करणारा शेतकरी, शेतमजूर, कष्ट करणाऱ्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत यासाठी आम्ही सतत लढतोय. यांच्या  योजनांसाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांचा 40 एकरातील बंगला विका आणि  ते पैसे तिकडे वापरा. सरकारने कष्टकऱ्यांसाठी योजना राबवण्यात. योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे. योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. 

यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, जिपच्या माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे, जिपचे सभापती ॲड. दिपक अलुरे, डॉ. मल्लिनाथ मलंग, प्रहारचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे मयूर काकडे, उमरगा बार कौन्सील अध्यक्ष ॲड. गोविंद गायकवाड, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष प्रफुलकुमार शेटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार आदीसह विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी तर प्रा. डॉ. विरभद्र स्वामी यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनीं, शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top