धाराशिव (प्रतिनिधी) -धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करून त्वरित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर श्री श्याम तेरकर, श्री कमलाकर दाणे, श्री समाधान पडुळकर व श्री राजू मैंदाड उपोषणास बसले आहेत. त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या उपोषणाला धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा संघर्ष चालू आहे. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून धाराशिव येथे अमरण उपोषण चालू आहे. त्या अमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जवळजवळ दीड हजार लोकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे. त्यासोबतच समाजातील विविध घटक लोकप्रतिनिधी यांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे.

 खासदार ओमराजे निंबाळकर यांचा पाठिंबा : 

धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय कार्यकर्त्याकडून समजून घेतला व गरज असेल त्यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्हीकडेही आरक्षण मिळवून देण्याचा विषय लावून धरतो असा शब्द दिला.

 

आमदार कैलास पाटील यांचा एस. टी. आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा :

 धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही एस. टी. आरक्षणाच्या संदर्भातील विविध गोष्टी कार्यकर्त्याकडून समजून घेतल्या त्यामध्ये ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्या सोबत स्वतः येऊन संबंधित अधिकाऱ्याला व शासनाबरोबर प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतो आणि लागेल ती मदत मी समाजाला करतो असा शब्द देऊन धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी ला पाठिंबा दर्शविला.


ढोकी ग्रामपंचायतचा धनगर समाजाला पाठिंबा 

ढोकी ग्रामपंचायतचे सरपंच श्री अमोल समुद्रे यांनी स्वतः उपोषण स्थळी येऊन भेट देऊन धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंबजावणीला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्यासोबत ढोकी गावचे अनेक कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.


टाकळी बेंबळी ग्रामपंचायत चा पाठिंबा : 

धाराशीव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या टाकळी ग्रामपंचायत चा धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पाठिंबा देण्यात आलेला आहे. यावेळी टाकळीचे सरपंच राहुल मासाळ व टाकळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राजुरी ग्रामपंचायतचा धनगर समाज एस. टी. आरक्षण अंमलबजावणी साठी जाहीर पाठिंबा 

 धाराशिव तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायत चा ठराव घेऊन धनगर एस. टी.  आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला विनंती करण्यात आलेली आहे व धनगर समाजाचा प्रश्न सोडवावा असं दिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. यावेळी राजुरी चे सरपंच मधुकर संपत गळकटे व उपसरपंच गणेश घोगरे उपस्थित होते. 


ग्रामपंचायत मेडसिंगा चा सकल धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा 

धनगर समाजाचे चार बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा प्रश्न अत्यंत योग्य असून लवकरात लवकर धनगर समाजाला एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे, असे ग्रामपंचायत कार्यालय मेडसिंगा यांनी दिलेल्या पत्रामध्ये जाहीर पाठिंबामध्ये व्यक्त करण्यात आलेले आहेत. या पाठिंबा पत्रावरती सरपंच अनुरोध दूधभाते व उपसरपंच रामकिसन शित्रे यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.  


सकल मराठा समाज धाराशिव यांचा जाहीर पाठिंबा

सकल मराठा समाज धाराशिव यांच्यातर्फे सकल धनगर समाज धाराशिव यांच्याकडून चालू असलेल्या अमर उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. शासन दरबारी नोंद असताना सुद्धा सरकारने धनगरांना आरक्षण पासून वंचित ठेवलेला आहे. या धनगरांच्या न्याय मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर धनगरांना एस. टी. च्या आरक्षण अंमलबजावणी करून देण्यात यावे. असे धनगर समाज यांना दिलेल्या पाठिंबामध्ये सकल मराठा समाज यांनी निवेदन केलेले आहे. या निवेदनावर संकेत सूर्यवंशी, गणेश साळुंखे, मुकुंद घाडगे, अभिजीत सूर्यवंशी, अमोल जाधव, अभिजीत देशमुख, बलराज रणदिवे, निखिल जगताप, लक्ष्मण हजारे, अक्षय नायकवाडी, ॲड. सचिन जाधव, दत्ता देशमुख, कल्पना निपाणीकर, आकाश मुंडे, अमर देशमुख, प्रशांत पवार यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हा धाराशिव चा जाहीर पाठिंबा 

सकल धनगर समाज करत असलेल्या उपोषणाचा योग्य विषय शासनाने लवकरात लवकर निकाली काढावा आणि धनगरांना एस. टी. आरक्षणाच्या अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिलेल्या पाठिंबा पत्रामध्ये निवेदन करण्यात आलेले आहे. या निवेदनावरती जिल्ह्याचे अध्यक्ष राजेभाऊ ओव्हाळ, संपत जानराव, भालचंद्र कठारे, सिद्धार्थ ओव्हाळ व सोमनाथ गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत.

  

सकल मराठा समाज मेडशिंगा यांचा जाहीर पाठिंबा 

धनगर समाज उपोषण करीत असलेल्या चार बांधवांना सकल मराठा समाज मेडसिंगा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. धनगर समाजाच्या न्याय प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असे निवेदन सकल मराठा समाज मेडसिंगा यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. या निवेदनावर मनोज जाधव, मधुकर जाधव, दत्तू रणदिवे, विठ्ठल रोहिले, संदीपान चित्रे, रणदिवे अण्णा, अनिल फरताडे, सत्यवान शित्रे, शहाजी आगळे, रामदास पांचाळ, नेताजी पडवळ, विनोद आगळे, गणेश शित्रे यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत.

 

आमदार राणागजितसिंह पाटील यांचा धनगर एस. टी. आरक्षण अंमलबजावणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळी तुळजापूर धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन धनगर समाजाच्या कार्यकर्त्याबद्दल व त्यांच्या प्रकृतीबद्दल आस्थेने चौकशी करून धनगर समाजाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे व सचिवालयाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतो आणि एस. टी. आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिले आहे.

 धनगर समाज उपोषण करीत असलेल्या प्रश्न लवकर निकालात काढण्यात यावा अशी विविध सामाजिक माध्यमातून सुध्दा मागणी करण्यात येत आहे.

 
Top