कळंब (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व मराठा आरक्षण देण्यात यावे यासाठी कळंबकर आक्रमक झाले असून त्यांनी दि. 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील दि. 20 जुलै पासुन अंतरवाली सराटी येथे पाचव्यानंदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत धाराशिव शहारालगत असलेल्या हातलाई तलावात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप करत कळंब तालुक्यातील मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाला. सायंकाळी 6 च्या सुमारास जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देत अचानक शेकडो मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा होऊन जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास याहीपेक्षा अधिक तीव्रतेने आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
दि. 8 जून 2024 पासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सरकारने दिलेल्या सगेसोयरे अध्यादेश लागू करण्याचा शब्द पूर्ण करावा व त्यांच्या इतर मागण्यासाठी अंतवली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तरी सरकारने तात्काळ याची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी विनंती सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्यावतीने करण्यात येत आहे. उपोषणा ची तात्काळ दखल न घेतल्यास पुढील काळात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.