धाराशिव/ कळंब (प्रतिनिधी)-  राज्य शासनाने नुकतीच लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महीलां व  मुलींकरीता प्रतिमाह 1500/- रू सानुग्रह अनुदान योजना चालू केली. जनतेच्या विनंतीवरून सदर योजना लाभार्थ्यांना विनाअडथळा मिळावी याकरीता उत्पन्न व रहिवाशी प्रमाणपत्रासह अनेक अटी राज्यशासनाने शिथील केल्या आहेत. तरीही तहसिल कार्यालयात उत्पन्न व रहिवाशी प्रमाणपत्राकरीता रोजच हजारो लाडक्या बहीणींचे अर्ज दाखल होत आहेत. विशेष गेल्या काही दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे सर्व कामे ठप्प आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या शिथील केलेल्या कागदपत्रांबाबत योग्य प्रबोधन न झाल्याने तसेच विवीध शैक्षणिक,उच्चशिक्षणाच्या अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थी व पालकांची विवीध प्रमाणपत्रांकरीता गर्दी होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्याही अर्जात मोठी वाढ होत आहे. शैक्षणिक कामाकरीता योग्य वेळी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार सर्वर डावून होवून प्रशासनाच्या कामात सातत्याने होणारा तांत्रिक अडथळा दुर करण्याकरीता प्रशासनाकडून याबाबत तातडीने उचीत उपाययोजना करण्याची अपेक्षाही विद्यार्थी व पालकांतून व्यक्त होत आहे.

 
Top