भूम (प्रतिनिधी)- भेटी लागी जीवा, लागलीसी आस... सावळ्या विठ्ठलाचे डोळे भरुन रुप पाहण्यासाठी संत मुक्ताईंच्या मानाच्या पालखीचे भूम शहरात हजारो वारकऱ्यांसह बुधवारी सकाळी 12 वाजता आगमन झाले. शहरात पालखीचे आगमन होताच शहरवासियांनी जोरदार आतषबाजी करत पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन घेतले.

सकाळी येथील वाशी रोडमार्गे गोलाई चौक मेन रोड मार्गे येथील चौडेश्वरी मंदिर येथे संत मुक्ताईचा पालखी सोहळा विसावला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सकाळचा नाष्टा नागोबा तरुण गणेश मंडळाच्यावतीने तर कोष्टी समाज बांधवांच्यावतीने सकाळचे भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. तसेच हा पालखी सोहळा रविंद्र हायस्कूल येथे मुक्कामी राहून बुधवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. शहरात संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व माजी उपनगराअध्यक्ष संयोगीता गाढवे यांनी पालखीचे स्वागत करुन लवकर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली. यावेळी साहिल सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरज गाढवे, साहील गाढवे, रामभाऊ बागडे,बालाजी अंधारे,यांच्यासह संजय गाढवे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पालखी सोहळा नगरपालिका चौकात दाखल होताच पालिकेच्यावतीने तुकाराम माळी, गणेश जगदाळे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालिका कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

 
Top