भूम (प्रतिनिधी)- देशातून आणि महाराष्ट्रभरातून वारकरी श्री विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीला जातात. शेकडो दिंड्या, पालख्या आणि लाखो वारकरी श्री विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होत पंढरीची वाट चालतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सर्व मंडळी पंढरीला जाते. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला आलेल्या लाखो वारकऱ्यांचा गोडवा आता कुंथलगिरीचा पेढा वाढवणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खवा क्लस्टरचा दहा टन पेढा पंढरपूरला जाणार आहे. विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टरला दहा टन पेढ्याची ऑर्डर आली आहे आणि पेढा बनवण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे.
खरंतर भूम आणि कुंथलगिरी परिसरात मोठ्या प्रमाणात पेढा आणि खव्याच्या भट्ट्या आहेत. परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पेढा पंढरपूरला जात आहे. त्यातच या पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पेढा सौर ऊर्जेवरती तयार केला असल्यामुळे निसर्गाची कोणतीही हानी झालेली नाही. एकच नाही तर पेढा हा मशीनच्या सहाय्याने तयार केला असल्यामुळे कमी मॅनपावर मध्ये पेढा तयार केला जातो. तयार झालेला हाच पेढा आता पंढरीच्या वारकऱ्यांचा गोडवा वाढ होणार आहे.