तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे कनिष्ठ व वरीष्ठ विभागाच्या करिअर कट्टा अंतर्गत यशस्वी उद्योगाची यशोगाथा या विषयावर प्रसिद्ध उद्योजक व तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरचे बी.ए चे माजी विद्यार्थी राजकुमार धुरगुडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, एका यशस्वी माणसाकडे सत्यशोधक प्रवृत्ती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चिकित्सक वृत्ती,संघटन कौशल्य,संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, कर्मचारी व्यवस्थापन,बाजारपेठेची नविन माहिती इत्यादी गुण असणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न सातत्याने होणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायात चुका कमी आणि प्रगती आधी हे सूत्र कायम स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता विज्ञाननिष्ठ बनून जीवनात यशस्वी वाटचाल करता येते. आपल्या मातीवर प्रेम करावे लागेल, जातीभेद, धर्मभेद न करता सर्वांना समानतेची वागणूक द्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला ही दिलेली देणगी आहे. मराठवाडा हा पूर्वी अप्रगत म्हणून ओळखला जायचा,पण बी ए करुन देखील यशस्वी होता येते म्हणून स्वतः मधील न्यूनगंड अगोदर दुर केला पाहिजे. दिल्याने मिळते हे यशस्वी आयुष्याचे दूसरे सुत्र आहे,पैशांची बचत म्हणजे पैसा वाढविणे असाही अर्थ होतो. तरुणांनी करमणूकीत जास्त वेळ न घालवता सतत उद्यमी रहाणे गरजेचे आहे. ध्येयाला गाठण्यासाठी जिद्द व चिकाटी असावीच लागते,म्हणजे दूरदृष्टी ठेवून अगोदरच तयारीत रहाणे आवश्यक आहे,आपण आपल्या उत्पन्नानुसार खर्च नियोजित करावा लागेल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.अध्यक्षीय समापनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील सुप्तगुण ओळखावेत, तुळजापूर ही आई जगदंबेची पवित्र भूमी आहे. त्याचप्रमाणे आता हीच पवित्र माती भविष्यात ज्ञान पंढरी म्हणून ओळखली जाईल असे प्रयत्न आपणाकडून होणे काळाची गरज आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आनंद मुळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ नेताजी काळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे यांनी पुढाकार घेतला.सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीं तसेच सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा एस.पी वागदकर यांनी मानले.

 
Top