धाराशिव (प्रतिनिधी)-शेत जमिनीचा फेरफार घेण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी एका तलाठ्याला 3 वर्षाची शिक्षा व 10 हजार रूपयांचा दंड धाराशिव येथील जिल्हा कोर्टाने ठोठावला आहे. उत्तमराव पांडुरंग तांबे, तलाठी सज्जा आंबेवाडी, अतिरिक्त कार्यभार कामेगाव व रूईभर असे तलाठी यांचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी हा निकाल दिला.
तांबे याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलिसात 2011 साली कमल 7,13(1) (ड) सह 13(2) ला. प्र. अधिनियम, सन 1988 अन्वये गुन्हा नोंद झाला होता. तांबे यांनी तक्रारदार यांचे शेत गट नं. 102 क्षेत्र 2 हेक्टर 2 आर शेत जमिनीचा फेरफार प्रतिवादी वसंत नरवडे यांचे नावे मंडळ निरीक्षक यांना सांगून न करण्यासाठी 5 हजाराची मागणी करून ते पंचा समक्ष स्विकारले होते. तपासी अधिकारी अश्विनी भोसले तत्कालीन पो. नि. लाचलुचपत प्रतिबंधन विभाग यांनी याचा तपास केला होता. सरकारी अभियोक्ता जोशी यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पो. शी. जे. ए. काझी यांनी काम पाहिले. तांबे यांना कलम 7 अन्वये 3 वर्ष कारावास व 10 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास व कलम 13(1) (ड),13(2) अन्वये 2 वर्ष कारावास व 10 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.