धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजातील 4 युवक गेल्या चार दिवसापासून धनगर समाजाला एस. टी. आरक्षण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले असताना उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.
धनगर समाजातील कार्यकर्ते शाम तेरकर, कमलाकर दाणे, समाधान पडुळकर व राजू मैंदाड हे चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. धनगर समाजाला एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी व प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, या मागणीसाठी हे उपोषण चालू आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी तानाजी सावंत हे उपोषण स्थळी जाऊन उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याच्या तब्येतीची विचारपूस करून प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. असे आश्वासन उपोषण कर्त्याला आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली पण उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र किंवा भेटत देत नाहीत तो पर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्यासोबत शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराजजी चौगुले उपस्थित होते.
आज परत एकदा भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. धनगर समाजाच्या या उपोषणाला जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव, जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत, सैनिक फेडरेशन, शिवा युवक संघटना आदींनी प्रत्यक्ष भेट घेवून पाठिंबा जाहीर केला आहे.