धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महाळंगी येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव रविवारी (दि.28) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरा होणार आहे. यात्रा महोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे शहर संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साळुंके यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

महाळंगी येथील श्री महालक्ष्मी देवीची दरवर्षी मोठी यात्रा भरते. प्रशांत साळुंके यांच्या शेतात मशागतीसाठी खोदकाम करताना ही मूर्ती आढळून आली होती. तिची विधीवत प्रतिष्ठापना करुन भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. संततीप्राप्तीसाठी देखील इथे हजारो भाविक नवस बोलतात. संततीप्राप्ती झालेले दांपत्य येथे नवसपूर्तीसाठी यात्राकाळात मोठ्या संख्येने येतात, अशी माहिती प्रशांत साळुंके यांनी यावेळी दिली.

यावर्षीही यात्रेनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी देवींची मूर्ती व पालखीचे पूजन, त्यानंतर मानकरी भारत ढवळे यांच्या निवासस्थानापासून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान होईल. पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांचे नवसपूर्ती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेत महाळंगी गावासह चिखली, रूईभर, आंबेवाडी, बेंबळीसह परिसरातील इतर गावांमधून हजारो भाविक दरवर्षी श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवात दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे श्री.साळुंके यांनी सांगितले.


 
Top