धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे औद्योगिक क्षेत्र करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो त्यास यश आले असून 367 एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लघु उद्योजकांची दिनांक 14 रोजी सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत 130 लघुउद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असल्याने यात 10 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

बैठकीत उपस्थित लघुउद्योजकांपैकी टेक्सटाईलसाठी 80 तर गारमेंटसाठी 50 जणांनी गुंतवणूक करण्यास तयारी दर्शवली आहे. या प्रत्येक उद्योगाला 50-100 कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती उपस्थित उद्योजकांनी दिली आहे. ही बाब अत्यंत आनंदाची आहे. यामुळे आपण 10, 000 रोजगार निर्मितीचे जे उद्दिष्ट ठेवले आहे ते सहज साध्य होईल असा विश्वास वाटत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी उद्योजकांनी त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी सामान्य सुविधा केंद्र, एक अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र व सीईटीपी उभे करण्याची मागणी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी याबाबत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, वस्त्रोद्योग विभागाचे केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक लवकरच लावून याची पूर्तता केली जाईल असे म्हटले. यावेळी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.


 परिसरातील शेतकरी एमआयडीसीसाठी जमिन देण्यासाठी तयार असल्याने भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल. लवकरच याला मूर्त रूप येणार असून 130 लघुउद्योगांच्या माध्यमातून 10 हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट सहज साध्य होईल. यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

-आमदार राणाजगजितसिंह पाटील

 
Top