धाराशिव (प्रतिनिधी)- रोहयो अंतर्गत मंजूर सिंचन विहिरीचे जिओ टँगिंग करण्यासाठी स्वतःसाठी दीड हजार तर साहेबांसाठी 10 हजारांची लाच स्विकारणारा कंत्राटी तांत्रिक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव प्रविण प्रार्श्वनाथ गडदे असे आहे.

तक्रारदारांना सिंचन विहिर मंजूर झालेली आहे. सदर विहिरीचे काम सुरू करण्यापूर्वी जिओ टॅगिंग अनिवार्य असल्याने तक्रारदार 3 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयात आले होते. यावेळी कंत्राटी तांत्रिक सहायक प्रविण गडदे यांनी  तक्रारदाराकडे जिओ टॅगिंग करून ऑनलाईन अपलोड करण्यासाठी 11 हजार 500 रूपयांची लाच मागितली होती. साहेबांसाठी 10 हजार रूपये व स्वतःसाठी 1 हजार 500 रूपये अशी डिमांड तक्रारदाराकडे ठेवली. लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी पंचायत समिती परिसरात सापळा लावला. तक्रारदार दुपारी कार्यालय परिसरात तक्रारदाराकडे आला असता कर्मचाऱ्याने स्वतःसाठी 1 हजार 500 रूपये व साहेबाच्या नावावर 10 हजार रूपयांची लाच स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले असून, आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलिस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशिष पाटील, अविनाश आचार्य यांच्या पथकाने केली.  

 
Top