वाशी (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात टाटा कंपनी मोठा प्रकल्प उभारत असून आता महावितरण कंपनीला वीजपुरवठाही   करणार आहे. वाशी (कळंब) परिसरात टाटा पॉवर कंपनीने 100 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. या प्रकल्पाचे टाटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.3 जुलै) थाटात भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाची जबाबदारी टाटा कंपनीने मे. ए. एन. माने व डॉ. तानाजी जाधव या कंपनीवर सोपविली आहे. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज महावितरणच्या सबस्टेशनला पुरवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात गावांसह शेतीलाही अखंडितपणे वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. 

जगभरातील नामांकित कंपनी म्हणून टाटा उद्योग समूहाला ओळखले जाते. कायम दुष्काळी भाग आणि देशाच्या मागास यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात टाटा कंपनी मोठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे.  पवनचक्कीसह टाटा कंपनी आता विजेचा प्रकल्पही उभारणार आहे. वाशी (कळंब) परिसरात टाटा पॉवर कंपनीकडून तब्बल 100 मेगावॅटचा विजेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे पुढील काळात टाटा पॉवर कंपनीचा आणखीन 200 मेगावॅटचा विजेचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे तब्बल 300 मेगावॅटचा विजेचा प्रकल्प होणारा आहे. यातून मिळणारी वीज ही महावितरणच्या सब स्टेशनला जोडली जाणार आहे. याची जबाबदारी में. ए.एन. माने व डॉ. तानाजी जाधव (टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य) या कंपनीवर सोपविलेली आहे. या भूमिपूजन सोहळ्यास टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, वाशीचे तहसीलदार घाडगे, अक्रम खान,  परेश सहस्त्रबुध्ये, शिवप्रसाद लखपती, अनिल नायर, रुपेश राय, राहुल हिरवे, प्रशांत शिंदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व टायगर ग्रुप सदस्यांना जिल्हाधिकारी  सचिन ओंम्बासे  यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक मे. ए.एन.  कंपनीचे सर्वेसर्वा अविनाश माने यांनी तर सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि आभार हे मे. ए.एन. माने कंपनीचे सदस्य कुलदीप कदम व अनिकेत तिडके यांनी मानले.


टाटा कंपनीची मोठी गुंतवणूक-सीईओ पाटील 

देशभरात टाटा कंपनी विविध राज्यांमध्ये विजेचे प्रकल्प उभारत आहे. केवळ नफा कमविणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता कंपनी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीमध्ये आम्हाला उद्योग उभारण्याचे भाग्य लाभत आहे. वाशी कळंब परिसरात 100 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारत आहे. कंपनीने मोठी आर्थिक गुंतवणूक केली असून सर्वांनी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार पाटील यांनी केले.


विविध कंपन्यांनी आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे-जिल्हाधिकारी ओंम्बासे

धाराशिव जिल्ह्यात विविध कंपन्या आता आर्थिक गुंतवणूक करत असून विविध प्रकल्प उभारत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आले असून कामही सुरू आहेत. आता टाटा पॉवर कंपनी वाशी येथे 100 मेगावॅटचा विजेचा प्रकल्प उभारत आहे. ही आनंदाची बाब असून महावितरणच्या सबस्टेशनला वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. कंपन्यांनी शेतकऱ्यांची जमीन घेताना नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच कंपन्यांना प्रकल्प उभारण्यात कोणी अडथळा करत असेल तर प्रशासन कंपन्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील. मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी कंपनीन घ्यावी. टाटा पॉवर कंपनीचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी व्यक्त केला.

 
Top