धाराशिव (प्रतिनिधी)- लोकांना गृहीत धरून राजकारण करणे हे चालत नसते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लादलेले निर्णय लोकांना आवडले नाहीत. त्यांनी निवडणुकीत दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये हे चालत नाही. त्यामुळेच देशात आज सक्षम विरोधीपक्ष निर्माण झाला आहे असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिली पत्रकार परिषद आयोजित केली होती. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात आपण 2009 ला नवखा होता. यापूर्वी कधीही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका लढविल्यापण नव्हत्या. पण ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद पर्यंतचे कामकाज मी समजून घेतले. आपल्याला जर कामकाजविषयी काही माहिती नसेल तर अधिकारी वर्ग आपली पोती ओळखतात. बऱ्याचदा मंत्र्यांनाही वेगवेगळ्या विभागाच्या योजनेसंदर्भात माहिती नसते. त्यामुळे आमदार, खासदार यांना प्रशासकीय कामकाजाची व विविध योजनेचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे असेही राजेनिंबाळकर यांनी सांगितले. मेडिकल कॉलेज व कृष्णा खोऱ्यातील पाणी संदर्भात बोलताना आघाडी सरकारच्या कार्यकाळात मी व आमदार कैलास पाटील आठवड्यातील तीन दिवस याच कामासाठी पाठपुरावा करीत फिरत असत. रामदरा तलाव व घाटणे बॅरेज तयार होवून 10 वर्षापेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील बैठक घेवून कामाला गती दिली. प्राधान्यक्रम बदलला. त्यामुळेच येत्या काही महिन्यात पाणी येण्याच्या मार्ग मोकळा झाला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाबाबतही आपण अनेक बैठका घेतल्याचे प्रोसिडींग जिल्हा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे असे सांगितले. विमा कंपन्या नफेखोरी कमविण्याच्या नांदात शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने विमा कंपन्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. एक प्रकाराचा असंतोष शेतकरी वर्गात असल्याचेही त्यांनी सांगितले. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, महेश पोतदार, भीमाशंकर वाघमारे आदी उपस्थित होते.2014 ते 2019 पर्यंत बरेच काही शिकलो

2014 ते 2019 या काळात सामान्य माणूस आणि आमदार, खासदार यामधील फरक पहायला मिळाला. पराभव झाल्या म्हणून खचलो नाही. उलट आत्मचिंतन केले. लोकांची कामे करत गेलो. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत विजय प्राप्त झाला. 2019 ला खासदार झाल्यानंतर सर्व विधानसभा मतदारसंघात कार्यालय चालू केले. दररोज सकाळी व्हीडिओ कॉन्फर्सद्वारे कामाचा आढावा घेत गेलो. त्यामुळेच हे यश मिळाले. 


हायवे बरोबरच पाणी आवश्यक

हायवे झाल्यामुळे या मतदारसंघातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढणार नाही. दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला शाश्वत पाणी व वीज दिले तरच दरडोई उत्पन्न वाढले. त्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्वाचा आहे. येत्या पाच वर्षात सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गासह अनेक विकास कामांना मुर्त स्वरूप देवून असा विश्वास खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला. 


 
Top