धाराशिव (प्रतिनिधी)-उपविभागीय अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांवर नियमांचे पालन न करता गुन्हा दाखल केल्याप्रकरणी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन गुरूवारीही सुरू होते. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. जनहित शेतकरी संघटनेने यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन शुक्रवारपर्यंत संपवण्याचे अल्टीमेटम दिले होते. तसेच संबंधित दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने अखेर हे आंदोलन शुक्रवार दि. 7 रोजी दुपारपासून स्थगित केले आहे असे माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश काळे यांनी दिली आहे.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व अन्य महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधात बेकायदेशीरपणे पोलिस पाटलाला मुदतवाढ दिल्याच्या कारणावरून आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये कोणत्याही नियमांचे पालन न करणे, सराईत गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देवून अटक करणे, असे आरोप करून महसूल कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. आनंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यावर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्हाभर शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची कोंडी झाली होती.  

या आंदोलनामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केली होती. आचारसंहिता तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे 144 कलम लागू असतानाही ठिय्या आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. संचिन ओंबासे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दुपारपर्यंत आंदोलन संपवण्याचा अल्टिमेटम दिला होता. शुक्रवारी दुपारी आंदोलन न संपवल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी इशारा दिला होता.  

 
Top