धाराशिव (प्रतिनिधी)- जरांगे-पाटील यांची प्रकृती उपोषणामुळे खालावत आहे. मराठा समाजाच्या जनभावना राज्य सरकारने ध्यानात घेवून तत्काळ प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाचे आरक्षण जाहीर करणे आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळ पाठविले. शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक संवाद साधला आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक पध्दतीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. पुढील महिनाभरात त्याअनुषंगाने सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जाईल, असेही शासनाच्यावतीने शिष्टमंडळाने जाहीर केले असल्याची माहिती शिष्टमंडळाचे सदस्य तथा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे 8 जूनपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि अभिमन्यू पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राज्य सरकारने सकारात्मक संवाद करणे अत्यावश्यक असल्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली खासदार संदिपान भुमरे,आमदार राणाजगजितसिंह पाटील, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, आमदार मेघना बोर्डीकर यांचे शिष्टमंडळ सरकारच्यावतीने बोलणी करण्यासाठी अंतरवली सराटी येथे पाठविले होते.
उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथे रूग्णाललयात दाखल केले असून रुग्णालयात जाऊन ना. शंभूराजे देसाई, खासदार संदीपान भुमरे व आ.राणा पाटील यांनी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली.
 
Top