धाराशिव (प्रतिनिधी)-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने नारी शक्तीला आर्थिक दृष्ट्या स्वालंबी, उच्च शिक्षित करण्यासाठी तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ऐतिहासिक कल्याणकारी निर्णय घेतले असून मुलींना मोफत उच्च शिक्षण व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा रु 1500 देण्यासारखे अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत.

या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर करण्यात आली असून 21 ते 60 वयोगटातील 2.5 कोटी आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. या निर्णयाचा 2 लाखाहून अधिक मुलींना लाभ मिळणार आहे. या योजनेतून मुलींना जवळपास 600 कोर्सेसची 100 टक्के फी माफ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना करण्यात येणार असून बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत देखील 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. महिलांसाठी पहिल्यांदाच एवढी मोठी तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार.

 
Top