धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व त्याचे मानवासह प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता दरवर्षी 5 जून हा 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. धाराशिव येथील रूपामाता फाउंडेशनच्या वतीने 5 जून रोजी पर्यावरण दिन निमित्त भल्या पहाटे रस्त्यावर फिरून प्लास्टिक संकलन करणाऱ्या महिलांचा टिफिन डबा व गुळ पावडर बॅग देऊन गौरव करण्यात आला.

शहरातील गटारात नाल्यामध्ये प्लास्टिक अडकल्याने  गटारी तुंबतात. तसेच हे प्लास्टिक शेती, नदी, नाले व तलाव यामध्ये वाहून जाते. अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या प्राण्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक जाते.  प्लास्टिक अविघटनशील असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे  रोखण्याचे काम या कष्टकरी महिला करत असल्याने या महिलाच पर्यावरण रक्षक व स्वच्छता दुत असल्याचे रुपामाता उद्योग समुह तथा फाऊंडेशनचे संस्थापक अँड.गुंड यांनी यावेळी सांगितले.

उद्योजक संजय पटवारी यांनी या महिला श्रमिकांना  रेनकोट देणार असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी उद्योजक संजय पटवारी, मृत्युंजय बनसोडे, महादेव पेठे, रूपामाताचे मिलिंद खांडेकर, सत्यनारायण बोधले, गजानन पाटील, राजेंद्र कापसे, नंदकुमार क्षीरसागर, अमर गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top