धाराशिव (प्रतिनिधी)- सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ मिळावे यासाठी लोकनेते डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाला पुष्पहार, पुष्पगुच्छ या ऐवजी वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील केले होते. त्याला प्रतिसाद देत दिनांक 1 रोजी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी अडीच लाखाहून अधिक किंमतीच्या वह्या देवून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस साजरा केला.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे डॉक्टर पाटील यांचा वाढदिवस हारतुरे देवून साजरा करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वह्या आणाव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी जिल्ह्यातील असंख्य नागरिक,नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अडीच लाखाहून अधिक रूपयांच्या वह्या देवून वाढदिवस साजरा केला.

दिवसभरात जमा झालेल्या वह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळातील गरजू विद्यार्थ्यांना नियोजनबद्धरित्या वाटप करण्यात येणार आहेत. समाजासमोर एखादा चांगला विचार आपण मांडला तर समाजही या विचाराला भरभरून प्रतिसाद देतो. हा सुखद अनुभव यानिमित्ताने आला. अलीकडच्या काळात वाढदिवसाला आलेले वेगवेगळे स्वरूप पाहता डॉक्टर पाटील यांच्या वाढदिवसाला एक वेगळा पायंडा पडला आहे असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.


जन्मदिवसाच्या निमित्ताने हार, तुरे टाळून शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वह्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नागरिक ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काही कार्यकर्त्यांनी आदराने हारतुरे आणि शाल देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात त्यालाही छेद देऊन सर्वांनीच मोठ्या प्रमाणात वह्यांचे संकलन करावे व गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन डॉ.पद्मसिंह पाटील यांनी केले आहे.

 
Top