धाराशिव (प्रतिनिधी)- ढोकी भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला. फेब्रुवारी 2024 नंतर ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला त्यांची उसाचे बिले अद्याप पर्यंत कारखान्याने दिले नाहीत. धाराशिव परिसरात सध्या समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या लगबगीत असून पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज करण्यात मग्न आहे. परंतु कारखाना प्रशासनाने अद्याप पर्यंत शेतकऱ्याची बिले अदा न केल्यामुळे शेतकरी संतप्त असून, त्यांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करून केले. 

शेतकरी मेटाकुटीला आला असताना कारखाना प्रशासनाने विलंब न करता आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांची बिले अदा न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी दिला. कारखाना प्रशासनातर्फे लेखापाल बिराजदार यांनी निवेदन स्वीकारत आंदोलकाचे म्हणणे व्यवस्थापनाला त्वरित कळवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आम आदमी पार्टीचे मेहबूब शेख, तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख, संजय दनाने, शहाजी पवार, अंकुश चौगुले, सुरेश शेळके श्रीकांत भुतेकर, रमाकांत हजगुडे, शेतकरी नानासाहेब वाघमोडे,  आखलाक शेख, बळीराम बोंदर, अक्षय आतकरे, लक्ष्मण आतकरे व इतर अनेक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top