धाराशिव (प्रतिनिधी) - केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या गलथान कारभारामुळे नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होऊन धोक्यात गेले आहे. विशेष म्हणजे राज्यातील पोलीस भरती चक्क चिखलात सुरू आहे. तसेच विविध मागण्यासाठी या दोन्ही अपयशी सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र संताप व्यक्त करीत दि.21 जून रोजी चिखलफेक आंदोलन करुन निषेध केला.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात येत आहेत. कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक. तसेच कांदा, कापूस व सोयाबीनसह कोणत्याही शेतमालाला कवडीमोल भाव असून हमीभाव कायद्याप्रमाणे भाव देण्यास उदासीनता. तर राज्यात खते, बी- बियाणांचा काळाबाजार बोकाळला असून कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे महीला व मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खुन पडले जात आहेत. राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली असून कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. मागील 10 वर्षापासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली असून राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठविले जात आहेत. 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, राजेंद्र शेरखाने, उपाध्यक्ष खलील सय्यद, प्रशांत पाटील, विलास शाळू, विजयकुमार सोनवणे, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राजेश शिंदे, ॲड. हनुमंत वाघमोडे, उमेश राजेनिंबाळकर, अशोक बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, धनंजय राऊत, कफील सय्यद, भूषण देशमुख, प्रभाकर लोंढे, काकासाहेब सोनटक्के, बाळासाहेब गपाट, महादेव पेठे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top